शिरपूर तालुक्यातील पिळोदा गावात ६२ वर्षीय किराणा दुकानदाराची निर्घृण हत्या

पिळोदा - पिळोदा गावात ६२ वर्षीय किराणा दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आली. गोपालसिंग बाबूसिंग परदेशी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ही घटना १ जुलै रोजी रात्री त्यांच्या राहत्या घरी घडली.
गोपालसिंग परदेशी हे रात्री १२.०१ ते १२.३० च्या दरम्यान घरी झोपलेले असताना, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आकाश पवन इच्छे (वय २२) याने घरात घुसून धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमेमुळे गोपालसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आकाश गावातून फरार झाला.
घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गोपालसिंग परदेशी यांचे पुतण्या संजयसिंह परदेशी (वय ३७) यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आकाश इच्छे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ पिळोदा गावात भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाचे निर्देश दिले. त्यांच्यासोबत शिरपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी, थाळनेर पोलीस ठाण्याचे API शत्रुघ्न पाटील, PSI दिलीप पवार आदी अधिकारी उपस्थित होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुराव्यांचे नमुने गोळा केले आहेत.
पोलिसांनी तपासासाठी API पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. पथकाला माहिती मिळाली की, आकाश इच्छे हा नाशिक जिल्ह्यातील देवळा परिसरात आहे. पथकाने नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत आलोक भास्कर कोळी (वय २१) रा. पिळोदा यालाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत. हत्येमागील नेमके कारण चौकशीनंतरच स्पष्ट होईल," असे API शत्रुघ्न पाटील यांनी सांगितले.