शून्यातून विश्व निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड ..!

शून्यातून विश्व निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड ..!

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी फाळणीनंतर पाकिस्तानचा भाग बनलेल्या अबोटाबाद येथे झाला. मनोज कुमारचे वडील त्या काळात भारतात (दिल्लीला) आले. मनोज कुमार यांनी फाळणीचे दुःख स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. ते अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यांना त्यांचे चित्रपट पहायला आवडायचे. त्यांच्याच चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी त्यांचे नाव हरिकिशन वरून मनोज कुमार असे बदलले. 

मनोज कुमार यांनी १९५७ मध्ये आलेल्या 'फॅशन' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर १९६० मध्ये त्यांचा 'कच्ची की गुडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले, जो यशस्वी झाला. मनोज कुमार यांनी 'उपकार', 'पत्थर के सनम', 'रोटी कपडा और मकान', 'संन्यासी' आणि 'क्रांती' सारखे अप्रतिम चित्रपट दिले. बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव 'भारत कुमार' असायचे.

मनोज कुमार यांचे कलाकारांसोबतच राजकारण्यांशीही चांगले संबंध होते. १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले. या युद्धानंतर मनोज कुमार यांनी त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींची भेट घेतली होती. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांना युद्धावर चित्रपट बनवण्यास सांगितले. तेव्हा चित्रपट निर्मितीचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता. 'जय जवान जय किसान' शी संबंधित 'उपकार' हा चित्रपट त्यांनी बनवला, जो प्रेक्षकांना खूप आवडला. मात्र लाल बहादूर शास्त्री स्वतः हा चित्रपट पाहू शकले नाहीत. ताश्कंदहून परतल्यानंतर लाल बहादूर शास्त्री हा चित्रपट पाहणार होते. पण ते शक्य झाले नाही.

मनोज कुमार यांनी पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक म्हणून कार्य केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. 'पूरब और पश्चिम', 'क्रांती', 'रोटी, कपडा और मकान' हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. मनोज कुमार यांच्यासारखे अभिनेते पुन्हा होणे नाही. माझा महाराष्ट्र न्युज कडून अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.