शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; बच्चू कडूंकडून सरकारचे स्वागत,आंदोलन मात्र सुरूच राहणार

शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; बच्चू कडूंकडून सरकारचे स्वागत,आंदोलन मात्र सुरूच राहणार

मुंबई (प्रतिनिधी)  : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे योजनेची अधिकृत घोषणा काही दिवसांनी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सहकार विभाग लवकरच योजनेच्या अटी व शर्तींबाबत सविस्तर परिपत्रक जारी करणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करताना आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफीसाठी झालेल्या संघर्षाला यश मिळाले आहे. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन निधीची रक्कम एक लाख रुपये करण्यात यावी, यासाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कडू म्हणाले की, केवळ कर्जमाफी पुरेशी नसून शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठीही सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी व्यापक धोरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आचारसंहिता संपल्यानंतर राज्यभरात या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असून सुमारे 36,585 कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकार उचलणार आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.