सत्तार-दानवेंची एकत्रीकरणाची मागणी; राऊत म्हणाले, निर्णय मातोश्रीवर
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग कामख्याला माहिती आहे, भाजप तो विसरली आहे. आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेचे दोन भाग केले. मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. तसेच दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, बरेच वेळा वाटते. पण माझ्या एकट्याला वाटून काय फायदा, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली होती. या सगळ्या प्रतिक्रियानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना एकच आहे. दोन शिवसेना असूच शकत नाही. जिथे ठाकरे आहेत, तिच शिवसेना.हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्याच नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ज्याला हे लोक शिवसेना म्हणतायत ती अमित शाह यांची शिवसेना, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच ज्यांचा स्वाभिमान झाला असेल, ज्यांना भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली असेल त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, असंही संजय राऊतांनी सांगितले.
तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर का गेलात? आज तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर घरगडी म्हणून काम करत आहात. ही भूमिका का स्वीकारली, त्यावर आधी भाष्य करा आणि तुमच्या नेत्यांना सांगा, असे संजय राऊत यांनी म्हटले. भाजपबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी, महाराष्ट्राला खड्डयात घालणं आहे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या नेतृत्वावाला सांगावं, त्यावर जाहीरपणे भूमिका व्यक्त केली पाहिजे अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेवरुन प्रतिक्रिया दिली.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतची इच्छा व्यक्त केलेली असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुतीमधील मित्र असलेल्या भाजपवर गंभीर आरोप केला आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी भाजपविरोधातील रोष व्यक्त केला, ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप अब्दुल सत्तारांनी केला. केवळ एवढंच नव्हे तर एकेकाळच्या भाजपच्या मित्र राहिलेल्या ममता बॅनर्जींचं उदाहरण देत, भविष्यात काळजी घेण्याचं आवाहन देखील अब्दुल सत्तार यांनी नेतृत्वाला केलं आहे.
शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपला सोडून जाणार नाहीत. अजित दादा असे एकमेव नेते होते, ज्यांनी भाजपला सोडलं असतं. कारण 2029 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. मात्र आता असं धाडस कोणी करणार नाहीत. कारण शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे दात नसलेले वाघ आहेत, जे फक्त गुरगुरातयेत. त्यांची अस्वस्थता सत्तेसाठी आहे, आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नासाठी अस्वस्थ आहोत, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले.




