सुनेत्राताईंना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर; यावर संजय राऊतांच भाष्य
मुंबई (प्रतिनिधी) : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नसली तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचाराच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो टाकण्यात आला होता. त्यानंतर लगेचच ती पोस्ट हटवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाले असाल, अजित दादा असेल, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील, तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात. ते शरद पवार यांच्यामुळे आहात याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कोण आहात? आम्ही कोण आहोत? आम्ही सगळे ठाकरे या नावामुळे आहोत. ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव हा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण करून दिला, तेच नसते तर आम्ही काय असतो? तुमचे आडनाव पवार आहे. तुमच्या पूर्वजांनी तुमच्या आडनावाला जे वलय निर्माण करुन दिले आहे. बारामती मध्ये शरद पवार हे लक्षात घ्या.
आज तुम्हाला मोदी आणि शाहांनी उभं केलं असेल पण जर पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतेच स्थान मिळाले नसते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली नसती किंवा कष्ट केले नसते तर आम्हाला सगळ्यांना या राज्यामध्ये काहीच करता आलं नसतं. त्याच्यामुळे माणसाने किमान कृतज्ञता ही ठेवायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
शरद पवार यांची पाठीशी पुण्याई आहे. तुम्ही कितीही नाही म्हटलं, कितीही टाळलं किंवा टाळण्याचा प्रयत्न केला तरी पवार साहेबांची पुण्याई आहे. निवडणुकीमध्ये जय आणि पराभव होत असतात. पण, पवार म्हणजे शरद पवार, दुसरा कोणी नाही. त्यांचीच पुण्याई बारामतीसह सर्वत्र आहे. त्यांचा हा कौटुंबिक विषय आहे आणि हा फक्त एका निवडणुकीपुरता आहे. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही. ही निवडणूक आम्ही अजितदादा यांना श्रद्धांजली म्हणून त्याच्याकडे पाहिलं, असे देखील संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. सुनेत्राताई पवार यांना जर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री करणार असतील तर हा भारतीय जनता पक्षाचा मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याआधी वारसदार म्हणून एकनाथ शिंदेंपेक्षा सुनेत्रा पवार यांची निवड करतात की काय? असं मला त्यांच्या बोलण्यात जाणवत असल्याचे देखील त्यांनी म्हटले.




