'सैराट' फेम तानाजी गळगुंडेचा 'हा' व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
मुंबई - गेल्या काही वर्षांपासून अनेक कलाकारांनी युट्यूबकडे आपली वाट वळवली आहे, आणि आता ‘सैराट’ मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता तानाजी गळगुंडेही यामध्ये सामील झाला आहे. त्याने नुकतंच स्वतः चं युट्यूब चॅनेल सुरू केलं असून, या चॅनेलवर तो प्रेक्षकांना ग्रामीण जीवनाची सफर घडवत आहे.

तानाजीने आतापर्यंत चॅनेलवर काही तासांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. गावाकडची सकाळ, मैत्रीतील गंमतीजंमती, आणि स्थानिक किस्से अशा अनेक गोष्टी तो प्रेक्षकांसोबत शेअर करत आहे. यापूर्वी त्याचे काही रील्स चांगलेच व्हायरल झाले होते, आणि आता तो युट्यूबवरही तोच मस्त अनुभव शेअर करत आहे.
नुकताच तानाजीने एक खास व्हिडिओ अपलोड केला आहे. ‘रानातली खवा पार्टी’. आजवर मटण, चिकन, किंवा दारू पार्ट्यांचे व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात, पण ही खवा पार्टी काहीतरी वेगळीच ठरली आहे. तानाजी आणि त्याच्या मित्रांनी मिळून रानात चुलीवर शुद्ध देशी दुधापासून अस्सल खवा बनवला. तब्बल १० लिटर दूध तीन-चार तास आटवून, कढईत सतत ढवळून त्यांनी साधारण दीड किलो खवा तयार केला. हा संपूर्ण अनुभव तानाजीने त्याच्या व्हिडिओत दाखवला असून, त्यातील ग्रामीण मजा प्रेक्षकांना विशेष भावली आहे.
https://www.facebook.com/watch/?v=1133012578291579
या व्हिडिओवर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी “मटण, चिकन, दारू पार्टी खूप पाहिल्या, पण खवा पार्टी पहिल्यांदाच पाहतोय आणि तीही एवढी मस्त,” अशा कमेंट्स केल्या आहेत.




