सोनम वांगचुकांनी अखेर उपोषण मागे घेतलं! शाह-नड्डा बैठकीनंतर मोठा तोडगा, 'इनसाइड स्टोरी' समोर
मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. या निर्णयामागे केंद्र सरकारसोबत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेची महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात सुमारे चार तास बैठक झाली. या बैठकीत वांगचुक यांच्या मागण्या, त्यांची प्रकृती आणि पुढील तोडगा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.यानंतर डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करत असल्याचा विश्वास दिला. त्याचबरोबर उपोषण मागे घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
यानंतर जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची भेट घेतली आणि सरकारकडून आश्वासनाचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. तसेच आंदोलनाच्या प्रतिनिधींशी लवकरच औपचारिक चर्चा होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने संबंधित विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडण्याची तयारी दर्शवली असून, त्याला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोनम वांगचुक यांनी लवकरच लडाखला परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्याआधी आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि समर्थकांची भेट घेऊन सरकारच्या आश्वासनाबाबत माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंदोलन शांततापूर्ण आणि संयमाने सुरू ठेवण्याचे आवाहनही ते करणार आहेत.




