४६ लाख भरूनही फ्लॅटचा ताबा नाही; महारेराचा बिल्डरला व्याज देण्याचा आदेश
पुणे (प्रतिनिधी) : घरासाठी लाखो रुपये भरूनही फ्लॅटचा ताबा न मिळालेल्या एका घरखरेदीदाराला महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) दिलासा दिला आहे. रावेत येथील ‘अर्बन स्कायलाइन फेज-२’ प्रकल्पातील फ्लॅटचा ताबा निर्धारित कालावधीत न दिल्याप्रकरणी महारेराने प्रकल्प विकसक ‘अर्बन स्पेस क्रिएटर्स’च्या संबंधित भागीदारांना खरेदीदाराला विलंबाचा व्याजासह मोबदला देण्याचे निर्देश दिले आहेत.

ओंकार मिलिंद कुलकर्णी यांनी याबाबत महारेराकडे तक्रार दाखल केली होती. मार्च २०२२ मध्ये त्यांनी ७८ लाख रुपये किमतीच्या फ्लॅटसाठी नोंदणीकृत करार केला होता. त्यापैकी जीएसटी वगळता ४६.८० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांनी विकसकाला अदा केली होती. करारानुसार ३० एप्रिल २०२५ पर्यंत फ्लॅटचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र, मुदत उलटूनही ना फ्लॅटचा ताबा मिळाला, ना प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले.
दरम्यान, गृहकर्जाचे हप्ते भरत असतानाही घराचा ताबा मिळत नसल्याने कुलकर्णी यांनी महारेराची मदत मागितली. त्यांनी विलंबाबद्दल व्याज, फ्लॅटचा ताबा आणि झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली होती.
सुनावणीवेळी विकसकाने कोविडनंतरची परिस्थिती, कामगारांची कमतरता, विविध प्रशासकीय मंजुरींमधील विलंब, महापालिकेचे कामबंदी आदेश, वाहतूक संप आणि बांधकाम साहित्य पुरवठ्यातील अडथळे यामुळे प्रकल्प रखडल्याचे सांगितले. तसेच, महारेराने प्रकल्प पूर्णत्वाची मुदत ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत वाढवून दिल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत महारेराने विलंबासाठी व्याज देण्याचे आदेश जारी केले.




