अशोक खरात प्रकरणावर सिनेमा; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेची चर्चा

अशोक खरात प्रकरणावर सिनेमा; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण समोर आलं आणि अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणानं सर्वांनाच हादरवून सोडलं, एवढंच काय तर, या प्रकरणानं राजकीय वर्तुळातही खळबळ माजली. कारण या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं  नाव समोर आलं. अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून ओरबाडणाऱ्या अशोक खरातला बेड्या ठोकण्यात आल्यात. तसेच, या प्रकरणातील अनेक आक्षेपार्ह्य व्हिडीओसुद्धा समोर आलेत. आता अख्खा महाराष्ट्र हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर, या सिनेमात रुपाली चाकरणकरांच्या भूमिकेत शिवसेना नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकणार असल्याचं बोललं जात आहे. 

नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांवर आधारित एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सैयद या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. स्वतः दीपाली सैयद यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना हा खुलासा केला. या सिनेमात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत असल्याची पुष्टी केली आहे. तेव्हापासूनच दीपालीसय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात अशोक खरातचा ढोंगीपणा, या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणामागील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडलं जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही प्रकाश टाकणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर येणारा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.