Miracle : 'ती' रुग्णवाहिका आदळली खड्ड्यात अन् आजोबा झाले जीवंत

Miracle :  'ती' रुग्णवाहिका आदळली खड्ड्यात अन् आजोबा झाले जीवंत

कोल्हापूर : कोल्हापूर म्हणजे खड्डेपूर अशी आजवर कोल्हापूरची ओळख बनली आहे. येथील रस्ते आजवर अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. परंतु पहिल्यांदाच हेच खड्डे आता एका वृद्ध व्यक्तीसाठी जीवदान देणारे ठरले आहेत. 

कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होते. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल झाली. 

जणू काही सिनेमातील सीनच घडला 

वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची तयारी झाली. रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले. आणि आज पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत. जणु काही सिनेमातील सीनच घडावा अशी ही घटना घडली आहे. 

असा घडला घटनाक्रम 

16 डिसेंबर रोजी पांडुरंग उलपे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत होते. तेंव्हा त्यांना  हृदयविकाराचा झटका आला. उलपे एकदमच घामाघूम झाले.पत्नी बाळाबाई उलपे त्या ठिकाणी आल्या. नंतर शेजाऱ्यांना बोलावून त्यांनी उलपे यांना रुग्णालयात हलवले. रात्री सुमारे साडेअकरा पर्यंत डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. पण शेवटी रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले. ही बातमी घरी पोचल्यावर पाहुणे ,नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीच्या तयारीसाठी घरी पोहचले. अंत्यविधीची तयारीही सुरू केली.

दरम्यान, रूग्णालयातून ॲम्ब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना रुग्णवाहिका खड्ड्यात आदळली आणि त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आलं. नातेवाइकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात ॲम्ब्युलन्स नेण्यास सांगितली. तेथे तात्यांवर पुन्हा उपचार झाले. तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले. आता हेच आजोबा शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले. सोमवारी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला.