Rain Update : पंचगंगा २२ फुटांवर, १८ बंधारे पाण्याखाली तर एनडीआरएफ तैनात
कोल्हापूर/ प्रतिनिधी : जिल्ह्यासह शहरात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, गेल्या 24 तासांत सरासरी तब्बल 214 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदीची पातळी आता 22.6 फुटांवर पोहोचली असुन जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे.

हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोमवारपर्यंत 'ऑरेन्ज अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 10 धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण क्षेत्रात तब्बल 9140 मिमी पावसाची नोंद झाली असून, खबरदारी म्हणून घटप्रभा आणि राधानगरी धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नदीकाठच्या गावांना पुराचा वाढता धोका लक्षात घेता, प्रशासनाने खबरदारी म्हणून 30 जवानांचे 'एनडीआरएफ' (NDRF) पथक कोल्हापुरात तैनात केले आहे. हे पथकाचे 24 तास पूरस्थितीवर बारीक लक्ष असणार आहे.
गगनबावडा येथील करूळ घाटात मोठी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच हिरण्यकेशी नदीवरील पर्यायी पूल खचल्यामुळे चंदगडकडे जाणारी वाहतूक आता आजरामार्गे वळवण्यात आली आहे.




