Solapur Crime : ...अन् त्याने प्रियकरासमोरच केले पत्नीवर सपासप वार

Solapur Crime : ...अन् त्याने प्रियकरासमोरच केले पत्नीवर सपासप वार

सोलापूर: पत्नी सोबत राहत नसल्याचा राग मनात धरून पतीने तिच्या प्रियकरासमोरच चाकूने छातीत वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच त्याने प्रियकराला सुद्धा ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी, पतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मी विनोद सरवदे, ( वय-२५ वर्षे, राहणार सध्या तेलघाणा सोसायटी रोड सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विनोद नामदेव सरवदे (राहणार जोशी गल्ली, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तू माझ्यासोबत राहणार नसशील तर...

लक्ष्मी सरवदे व तिचा प्रियकर मनोज चौगुले हे दोघे मंगळवारी 29 एप्रिल 2025 रोजी पहाटे अडीचच्या सुमारास सोलापुरातील एमआयडीसीमधील अनंत तारा लोन शेजारील चौकात रिक्षाची वाट बघत थांबले होते. लक्ष्मीचा पती विनोद बुलेटवर त्याठिकाणी आला. लक्ष्मी “तुझ्याशी दोन गोष्टी बोलायचे आहेत असे बोलून बाजूला घेऊन “तू माझ्यासोबत राहणार नसशील तर, मी तुला कोणासोबतच राहू देणार नाही, आता मी तुला संपवतो”असे म्हणून त्यांच्या जवळील चाकू काढून फिर्यादीचे छातीत दोन वेळा खुपसून तसेच डाव्या हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

प्रियकरालाही दिली जीवे मारण्याची धमकी

विनोदने पत्नी लक्ष्मीला गंभीर जखमी केले. तसेच, पत्नीचा प्रियकर मनोज चौगुले याला हातातील चाकू दाखवून 'तू जर आमच्यामध्ये आलास, तर तुला पण संपवतो', अशी धमकी दिली आहे. या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका केंद्रे या करीत आहेत.

पोलिसात हजर व्हायला आल्यावर वार

पत्नी घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद विनोद सरवदे याने एमआयडीसी पोलिसांत दिली होती. ही बाब समजल्यावर लक्ष्मी सरवदे पोलिसांत हजर व्हायला आली होती. त्यावेळी पोलिसांनी तिच्या पतीसह नातेवाइकांना बोलावून घेतले होते.

पोलिसात जबाब दिल्यावर लक्ष्मीने प्रियकरासोबत राहणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी चिडलेल्या पतीने पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यावर काही अंतरावर गेल्यावर पत्नीवर वार केले. तिच्यावर उपचार सुरू असून तब्येत सुधारल्याची माहिती पोलिसांनी दिली.