अभिनेता किरण माने यांच्या 'या' सोशल मीडिया पोस्टवरून वाद पेटला

अभिनेता किरण माने यांच्या 'या' सोशल मीडिया पोस्टवरून वाद पेटला

मुंबई - अभिनेता किरण माने अनेकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिले आहेत. सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या मतांमुळे वाद निर्माण झाले आहेत. विशेषतः केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या टीका सातत्याने होत असल्याने, ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. आता पुन्हा एकदा किरण माने यांच्या फेसबुकवरील एका पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. यावेळी वादाचा केंद्रबिंदू ठरले आहे नेपाळमधील सध्या सुरू असलेले आंदोलन.

नेपाळच्या पार्श्वभूमीवर पोस्ट, भाजपकडून आक्षेप - 

९ सप्टेंबर रोजी किरण माने यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते: "भक्तडुक्कर पिलावळींनो, नेपाळ बघताय नं?आपल्याकडे फरक इतकाच असेल की, रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही पिसले जाणार.सुट्टी नॉट."

या पोस्टवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, नाशिकमधील ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) शाखेने यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या म्हणण्यानुसार, किरण माने यांची ही पोस्ट भारतातील लोकशाहीविरोधात असून ती समाजात तेढ निर्माण करणारी आहे. सागर तानाजी शेलार या ३१ वर्षीय तरुणाने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अवमानकारक भाष्य करण्यात आले आहे.

पोस्टचा मजकूर अत्यंत आक्षेपार्ह असून त्यामुळे समाजात शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे किरण माने यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.