कोल्हापूर - पुणे महामार्गाची दुरवस्था ; काम कधी पूर्ण होणार? खा. सुळेंच्या सवालानंतर मंत्री गडकरींचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली - खराब रस्त्यांवर टोल न आकारण्याचे स्पष्ट आदेश असूनही कोल्हापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील विस्तारीकरणाचे काम आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साधारणपणे चार ते पाच तासांत पार होणारे हे अंतर आता आठ ते नऊ तास घेत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत या रस्त्याच्या कामाच्या विलंबाचा मुद्दा उपस्थित करत ते काम नेमके कधी पूर्ण होणार, अशी विचारणा केली.

या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुणे - कोल्हापूर हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून पुणे - सातारा हा भाग पूर्वी रिलायन्सकडे असल्याने त्यात अडथळे होते. आता तो करार संपुष्टात आणून रस्त्याचा नवीन अभ्यास सुरू केला आहे. पुण्यातील वेस्टर्न बायपासच्या सर्व्हिस लेनचे कामही बजेट तरतुदीतून सुरू आहे. पुणे - सातारा मार्गाच्या संपूर्ण सुधारणेसाठी 6 हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे आणि विभाग लवकरच या कामाला सुरूवात करणार आहे. खंबाटकी घाटातील बोगद्याचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडकरी पुढे म्हणाले की सातारा - कोल्हापूर हा टप्पा आधीच मंजूर असून काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या आठवड्यात त्याबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. कोल्हापूरचे खासदार आणि इतरांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून प्रकल्प पूर्ण करण्याचे निश्चित प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण प्रकल्प एका वर्षात पूर्ण करून बीसीएस आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहतुकीत कोणताही अडथळा येणार नाही, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.




