जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी रुग्ण बनून केले ‘स्टिंग ऑपरेशन’
कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. यांनी हसूर (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतः रुग्ण बनून अचानक भेट देत उशिरा येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. तब्येत बरी नाही म्हणून तपासणीसाठी आलोय, असे सांगत ते सकाळीच केंद्रात पोहोचले. मात्र, कामाची वेळ सुरू होऊनही डॉक्टर आणि अनेक कर्मचारी हजर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कार्तिकयन एस. यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळेही रुग्णांमध्ये बसून चर्चा करत होते. रुग्णांनी डॉक्टर आणि कर्मचारी वेळेत येत नसल्याची तक्रार सांगितली. थंडीमध्ये तासन्तास वाट पाहावी लागते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या तक्रारींची व उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांची पाहणी करून CEO यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले.
या भेटीदरम्यान औषधसाठा, नोंदी, स्वच्छता, रजिस्टर आणि बायोमेट्रिक उपस्थितीचीही पाहणी करण्यात आली. आरोग्य अधिकाऱ्यांनी सकाळी ८.३० ला वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सर्वांनी मुख्यालयात राहून नागरिकांना उत्तम सेवा द्यावी, एकही तक्रार येऊ नये, असे कार्तिकयन एस. यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अशा आकस्मिक भेटी पुढील काळातही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.




