"बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना" - अच्युत गोडबोले

कोल्हापूर (प्रतिनिधी) - उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या 'दीक्षारंभ' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक, तंत्रज्ञ, लेखक, वक्ते, मार्गदर्शक अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंगच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. एनआयटी कोल्हापूरमध्ये इनोव्हेशनला प्रोत्साहन दिले जाते याबद्दल त्यांनी सुरूवातीलाच काॅलेजचे कौतुक केले. त्यांनी एआय, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, चॅट जिपीटी, बीग डेटा, डिजिटल प्रिंट, इंडस्ट्री ४.०, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हे नवीन तंत्रज्ञान कसे काम करते, यांचा परस्पर संबंध व मानवी दैनंदिन जीवनातील त्यांचा वापर याविषयी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एआयने नोकऱ्या न जाता त्यांचे स्वरूप व कार्यपद्धती बदलेल आणि तंत्रज्ञानाधारित अनेक नोकऱ्या नव्याने निर्माण होतील हा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत राहात बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी विद्यार्थी व स्टाफच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देताना चॅट जिपीटीचा वापर फक्त अज्ञात माहिती मिळवण्यासाठी करावा, प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे असे सर्वांना सावध केले.
'प्रिन्स शिवाजी' चे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी गोडबोले यांचा सत्कार केला. अच्युत गोडबोले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करून देशसेवेसाठी आपले करिअर घडवावे असे प्रतिपादन चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी केले. एनआयटीचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी संस्थेचा इतिहास, एनआयटीमधील इनोव्हेशन, स्टार्टअप व स्किल डेव्हलपमेंट धोरण, शिक्षण पद्धती, विविध योजना सांगतानाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची कटिबद्धता व्यक्त केली. टिपीओ प्रा. किरण वळीवडे यांनी एनआयटीचे नोकरी व उद्योजकता धोरण विशद केले. आयुष दाभोळे या शालेय विद्यार्थ्याने गोडबोले यांना आपण लिहिलेले पुस्तक भेट म्हणून दिले. गोडबोले यांची पुस्तके घेण्यासाठी उपस्थितांची रीघ लागली होती.
प्रास्ताविक प्रा. मोहन शिंदे, सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील तर आभारप्रदर्शन प्रा. प्रविण जाधव यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, संचालक वाय. एल. खाडे, विनय पाटील, फार्मसी प्राचार्य डाॅ. सचिन पिशवीकर, डाॅ. रविंद्र कुंभार, सर्व विभागप्रमुख, स्टाफ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.