मराठा आरक्षण मोर्च्यात दुर्दैवी घटना : मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षण मोर्च्यात दुर्दैवी घटना : मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई - ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक जालन्याहून मुंबईकडे निघाले आहेत. या आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, युवकांबरोबरच वृद्ध आणि महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत. “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही,” असा ठाम निर्धार घेत आंदोलनकर्ते मुंबईकडे वाटचाल करत आहेत. मात्र, या मोर्चादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात आंदोलनात सहभागी असलेले सतीश देशमुख यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मूळचे बीड जिल्ह्याचे आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले सतीश देशमुख हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते. मात्र, जुन्नरजवळ त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि काही क्षणांतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने आंदोलनकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, देशमुख नावाच्या आमच्या समाजबांधवाचा मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खद बातमी आहे. प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटल्याचे समजते. यासंदर्भात अधिक माहिती घेत आहोत, या मृत्यूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. जर मराठा समाजाला वेळेत आरक्षण दिले असते, तर असे बळी गेले नसते. लातूरमध्ये देखील असाच प्रकार घडला आणि आता पुन्हा एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या विलंबामुळे आमचा समाज तडफडतो आहे.” 

या घटनेने मराठा आरक्षणाच्या लढ्याला नव्याने धार मिळाल्याचे दिसत असून, आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.