मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटात नाराजीचा सूर

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटात नाराजीचा सूर

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३२ विभागप्रमुख आणि ३ विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. भाजपकडून मुंबई महापौरपदाचा दावा करण्यात येत असताना, शिंदे गट अधिकाधिक जागांवर विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरला आहे. २०१७ मधील निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांना शिंदे गटाने आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे. ठाकरे गटातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही फोडण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंना यश मिळाले आहे. मात्र, विभागप्रमुखांच्या नव्या नियुक्तीनंतर पक्षात नाराजीचा सूर पहायला मिळतो.

पश्चिम उपनगरात असंतोषाचा विस्फोट -

विशेषतः पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी आणि चारकोप भागात नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे. या भागातील काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत आहेत.

विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातील जितेंद्र जानावळे यांना विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली असली तरी, त्यांना विभागप्रमुखपदाचे आश्वासन पूर्वी देण्यात आले होते. ते म्हणाले, “मी शिवसेनेत ३० वर्ष काम केलं. पक्षात सामील करताना विभागप्रमुखपद देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं होतं. आता ते न मिळाल्यामुळे आम्हाला नाराजी आहे.”

गोरेगाव आणि दिंडोशी भागातील गणेश शिंदे यांनी देखील असंतोष व्यक्त केला आहे. "तीन वर्ष संघर्ष करून पक्ष उभा केला. विभागप्रमुखपदाचं आश्वासन दिलं गेलं होतं. जर न्याय न मिळाला, तर शेकडो कार्यकर्त्यांसह वेगळी वाट पत्करू," असा इशाराही त्यांनी दिला.

चारकोपमध्ये तर कोणतीही नियुक्तीच करण्यात आलेली नाही, ज्यामुळे इच्छुक नेते संजय सावंत संतप्त झाले आहेत. ते म्हणाले, “मी आणि माझे कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत.”

या घडामोडींमुळे शिंदे गटात अंतर्गत नाराजी वाढली असून, निवडणुकीच्या तोंडावर हा असंतोष पक्षासाठी अडचणीचा ठरू शकतो.