मोशी दुर्घटनेतील 14 तासांचा थरार! जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलाने वाचवले 9 जण

मोशी दुर्घटनेतील 14 तासांचा थरार! जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलाने वाचवले 9 जण

पुणे (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेले धाडस सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तब्बल 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जवानांनी तब्बल 14 तास जीवाची बाजी लावत बचावकार्य केले.

जवान अनिल वाघ, पुंडलिक भुतापल्ले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. बुधवारी दुपारी दुर्घटना घडल्यानंतर दुपारी 2 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत आणि गुरुवारी सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 पर्यंत त्यांनी सलग बचावकार्य सुरू ठेवले.

कोसळलेल्या स्लॅबखाली आणि कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान होते. आतमध्ये ऑक्सिजनची कमतरता, विषारी वायू आणि ढिगारा पुन्हा कोसळण्याचा धोका कायम असतानाही जवानांनी एअरबॅग आणि विशेष उपकरणांच्या मदतीने मार्ग तयार केला. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी एकामागून एक 9 जणांना सुरक्षित बाहेर काढत त्यांना नवजीवन दिले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या वक्तव्यावरही चर्चा सुरू झाली आहे. "ही नैसर्गिक दुर्घटना असून कोणालाही दोषी धरता येणार नाही," असे त्यांनी म्हटले. मात्र, इमारतीच्या सुरक्षिततेबाबतचे निकष, बांधकामातील संभाव्य त्रुटी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प, त्याचे कंत्राटदार आणि दुर्घटनेमागील नेमकी कारणे याबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे. बचावकार्य करणाऱ्या जवानांच्या शौर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच, दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही आता अधिक जोर धरू लागली आहे.