अन्यायाविरोधात दाद मागणारे कमी झाले तर दुखण्यावर रडायला माणसे मिळणार नाहीत - माजी खासदार राजू शेट्टी
करवीर (प्रतिनिधी): कसबा बीड येथील कॉम्रेड कै.नामदेव गावडे यांचा चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . या व्याख्यानमालेमध्ये बोलताना शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी डाव्या आघाडीच्या चळवळीतून जे निखारे तयार झाले आहेत, त्यांना जपणे काळाची गरज आहे, कारण अन्याय विरोधात दाद मागणार्याची संख्या कमी होत चालली आहे .ही परिस्थिती अशीच राहिली तर स्वतःच्या दुखण्यावर रडायला माणसे मिळणार नाही .स्वतःची भाकरी खाऊन समाज काम करणारे नेतृत्व व चळवळीची माणसे जपणे आवश्यक आहे.

शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी नसून उद्योजकांसाठी तयार करण्यात येत आहे .या महामार्गावर ज्या शेतकऱ्यांची शेत जमिन जाणार,तसेच हा महामार्ग बनवण्यासाठी जो भराव टाकावा लागणार आहे, त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांची थडगी बांधून होणाऱ्या विकासाला विरोध आम्ही करणारच .जागतिक बँकेने या महामार्गामुळे महापुर आल्यावर होणाऱ्या परिस्थितीला सुधारण्यासाठी 4000 कोटी रुपये दिले आहे .त्यातील 3000 कोटी रुपये हे सत्ताधाऱ्यांनी गटारी बांधण्यासाठी खर्च केले आहेत .महापूर आल्यानंतर सर्वसामान्य जनतेने करायचे काय ? सर्वजण मिळून मिळणाऱ्या पैशातून भ्रष्टाचार करण्यासाठी मोठ्या नेत्यांपर्यंत उत्साही झालेले आहेत ,तरी शेतकऱ्यांनी जागरूक राहावे व स्वतःचे नुकसान करून घेऊ नये असेही राजू शेट्टी यांनी सांगितले .यावेळी गावातील गुणवंताचा सत्कार करण्यात आला .यामध्ये पाडळी खुर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले राजेंद्र सूर्यवंशी,कसबा बीड ग्रामपंचायत उपसरपंच विजय गावडे,पोलीस परीक्षक अधिकारी मनीष मारुती पाटील,अग्निवीर मधून निवड झालेले श्रेयस सातपुते,स्पर्धा परिक्षेमधून शामल विठ्ठल वरुटे, समीक्षा अभिजीत गावडे,अनुष्का राजेंद्र सूर्यवंशी,आदी तसेच गुणवंत विद्यार्थी, एफसी फुटबॉल संघ व कल्लेश्वर क्रीडा स्पोर्ट क्रिकेट खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी मुकुंद पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये चार भिंतीत बसून ठरवलेल्या व वर्तमानपत्रातून सांगितलेल्या या प्रोजेक्टला प्रॉपर प्लॅनिंग नाही .मनमानीप्रमाणे नवीन शक्तीपीठ महामार्ग म्हणजे एक प्रकारची मोगलाई आहे . लोकशाहीमध्ये सर्वांना घेऊन निर्णय घेण्यात यावा . असे सांगितले .अध्यक्षीय भाषणामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सहसचिव गिरीश फोंडे यांनी न रहेगा बास,न बजेगी बासुरी या म्हणीप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग हे हिमनगाचे टोक आहे . महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनासारखी आंदोलने करावी लागणार आहेत .या शक्तिपीठ मार्गामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडणार आहे असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सहसचिव गिरीश फोंडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार,बाळासाहेब पाटील,बाजीराव देवाळकर, सुनिल नामदेव गावडे, उपसरपंच विजय गावडे,कॉम्रेड दिनकर सूर्यवंशी,कुंभी कासारी साखर कारखाना संचालक दादासो लाड,यशवंत बँकेचे संचालक जयसिंग सूर्यवंशी,नंदकुमार पाटील, शेतकरी नेते मुकुंद पाटील,शामराव सूर्यवंशी,सर्जेराव सूर्यवंशी, आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णात गावडे व आभार बबन गावडे यांनी केले.




