आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसालाही गैरहजर, खासदारांच्या बैठकीलाही दांडी; 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (14 जून) मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी लोकसभा खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीस काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर काहींनी ऑनलाईन सहभाग घेतल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले तेच पाच खासदार या बैठकीलाही गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.मातोश्रीवरील बैठकीला ठाकरे गटाचे केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. विशेष म्हणजे, विविध कारणे देत अनुपस्थित राहिलेले पाच खासदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही दिसले नव्हते. त्यामुळे हे खासदार पक्ष नेतृत्वापासून जाणीवपूर्वक अंतर राखत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यात 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना वेग आला असताना या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी अनुपस्थित खासदारांनी गैरहजेरीचे कारण स्पष्ट करावे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.पक्षातील नेत्यांच्या माहितीनुसार पाच खासदारांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. मात्र बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांचा थेट संवाद केवळ नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उर्वरित खासदारांनी नेमके कोणते कारण दिले, याकडेही लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत उद्धव ठाकरे काही खासदारांना पुन्हा चर्चेसाठी बोलावणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संबंधित खासदार मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेणार की सध्याचा दुरावा कायम ठेवणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.एकाच वेळी वाढदिवसाचा कार्यक्रम आणि खासदारांची बैठक या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित राहिलेल्या पाच खासदारांमुळे पक्षांतर्गत घडामोडींविषयी नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.




