आमदार शरद सोनवणेंच्या पिंपळवंडी गावात धक्कादायक घटना; चिमुकलीवर अत्याचार अन् हत्या,

आमदार शरद सोनवणेंच्या पिंपळवंडी गावात धक्कादायक घटना; चिमुकलीवर अत्याचार अन् हत्या,

जुन्नर / पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अशाच प्रकारची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. आमदार शरद सोनवणे यांच्या गावातच ही घटना घडल्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१८ ऑगस्ट) दुपारीसाडेतीन ते चार वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घरी नसल्याने तिची शोधमोहीम सुरू झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने या १० वर्षीय मुलीलाशेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची हत्या केली. शोध घेत असताना ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली.

पोलीस प्रशासनाकडून तपासाला वेग घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. विविध तपास यंत्रणांना या प्रकरणात पाचारण करण्यात आले असून, संशयित आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

ग्रामस्थांकडून कठोरात कठोर शिक्षेची मागणी पिंपळवंडी येथील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी या घटनेबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि नराधम आरोपीला कायद्यानुसार फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.