उत्पादन वाढीसाठी 'शाहू' च्या रोपवाटिकेतील दर्जेदार - निरोगी ऊस रोपांचा वापर करा - अमरसिंह घोरपडे

उत्पादन वाढीसाठी 'शाहू' च्या रोपवाटिकेतील दर्जेदार - निरोगी ऊस रोपांचा वापर करा - अमरसिंह घोरपडे

कागल (प्रतिनिधी) - ऊस लागवडीत उत्पादन वाढीसाठी उत्तम दर्जाचे बियाणे हा मुख्य घटक आहे. 'शाहू'च्या शेतकऱ्यांना दर्जेदार व खात्रीशीर ऊस रोपे उपलब्ध करून देण्यासाठी शाहू साखर कारखान्यामार्फत 'शाहू ऊस रोपवाटिका' सुरू करण्यात आली आहे.या ठिकाणी संशोधन केंद्र व कारखाना फार्मवर लागवड केलेल्या ऊस बियाणापासून शास्त्रीय पद्धतीने ऊसाची रोपे तयार करण्यात येत आहेत.ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले. शाहू साखर कारखाना संचलित 'शाहू ऊस रोपवाटिके' तील ऊस रोपांच्या शेतकऱ्यांना वितरणवेळी ते बोलत होते.

उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्यासह  संचालक सचिन मगदूम,संजय नरके,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कार्यक्षेत्रातील चार शेतकऱ्यांना ऊस रोपांचे वितरण केले.यामध्ये नंदकुमार नाईक (कागल),शिवाजी खोत(लिंगनूर दूमाला)कृष्णात भिसूरे(व्हन्नूर )बसगोंडा मगदूम(मौजे सांगाव)या शेतकऱ्यांचा समावेश होता. 

उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे पुढे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे साहेब यांच्या दूरदृष्टीतून शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढीसाठी त्यांना शास्त्रीय माहिती मिळावी.यासाठी स्वतंत्र ऊस विकास विभाग सुरू केला.या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.याचाच पुढचा भाग म्हणून अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल व मुरगूड येथे कारखाना संचलित ऊस रोपवाटिका सुरू करण्यात आली आहे. दर्जेदार व चांगल्या ऊस रोपांची निर्मिती करणाऱ्या रोपवाटिकांमार्फतही सभासद शेतकऱ्यांना क्रेडिटवर ऊस रुपये पुरवठा करण्यात येत आहेत.याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले ४६ वर्षात शाहूने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.शेतकऱ्यांना शाहू कृषी संघामधून चांगली खते पुरविण्यात येत आहेत.कारखाना मालकीची अद्यायावत माती परीक्षण प्रयोग शाळा कार्यरत आहे.ऊस लागणीपासून ते तोडणीपर्यत कारखाना शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणेसाठी कटिबद्ध आहे.शास्त्रीय पद्धतीने ऊस शेती करुन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी शाहूच्या ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. 

ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी स्वागत केले.शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.