‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’ राज ठाकरेंच्या मोजक्या शब्दांतील पोस्टची चर्चा, नेमकं काय म्हणाले?

‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’ राज ठाकरेंच्या मोजक्या शब्दांतील पोस्टची चर्चा, नेमकं काय म्हणाले?

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सोशल मीडियावर मोजक्या शब्दांत एक पोस्ट केली आहे. यामध्ये ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच..’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत. सध्या राज ठाकरेंच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही..’ अशी सूचक टीका राज ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा या टीकेचा रोख नेमका कोणाकडे आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी संमेलन पार पडलं. या संमेलनात महाराष्ट्र बहुभाषिक असल्याचं विधान करण्यात आलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या टीकेचा रोख अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हिंदी संमेलनाकडे आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

 महाराष्ट्राच्या भूमीवर कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली अशा अनेक भाषांचा विकास झाला आहे आणि त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. महाराष्ट्रापेक्षा मोठं बहुभाषिक राज्य संपूर्ण भारतात दुसरं नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. हिंदी दिवस आणि सहावं अखिल राजभाषा संमेलन नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्र बहुभाषिक असल्याचं विधान केलं.

 महाराष्ट्राच्या बहुभाषिक संस्कृतीलाही मी प्रणाम करू इच्छितो. येथे मराठीचा सन्मान आहे आणि तो असायलाच हवा. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मराठीला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलं. मात्र, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भूमीवर कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली अशा अनेक भाषांचा विकास झाला आहे आणि त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. महाराष्ट्रापेक्षा मोठं बहुभाषिक राज्य संपूर्ण भारतात दुसरं नाही, असं अमित शाह म्हणाले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभाषा आणि मातृभाषेचा सन्मान करण्याचा नेहमीच आग्रह धरला. तसेच, देशाची राजभाषा ही भारतीय भाषा असावी, यासाठी मातृभाषेसोबत किमान एक तरी दुसरी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देत पंतप्रधान मोदी यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना पुढे आणली असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं.

 जागतिक मंचावर पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीमध्ये बोलणारे भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने हिंदीचा स्वीकार केला असल्याचं नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगभरातील विकसित राष्ट्रे त्यांच्या राजभाषेत बोलतात, तर विकसनशील राष्ट्रे दुसरी भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राजभाषा आणि मातृभाषेचा सन्मान तितकाच महत्त्वाचा आहे. आज जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदीमध्ये बोलतात, त्यावेळी आपल्या राजभाषेला मिळणारा सन्मान पाहून अभिमान वाटतो. हिंदी भाषेने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये संपर्काचं माध्यम म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

 त्यामुळे मराठी आपली आई आहे, तर दुसऱ्या भाषा मावशी आहेत आणि त्या सर्व भाषांचा आपण सन्मान करतो. आज राजभाषा दिवसाच्या निमित्ताने मातृभाषेसोबतच राजभाषा आणि इतर राज्यांच्या भाषांचाही सन्मान करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. राजभाषा हिंदीचा विस्तार हा कोणत्याही प्रांतीय भाषेचं स्थान घेण्यासाठी नसून सर्व भारतीय भाषांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी आहे. महाराष्ट्राने नेहमीच सर्व भाषांचा आणि संस्कृतींचा सन्मान केला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे; त्याचवेळी हिंदीलाही महाराष्ट्राने कायम मान-सन्मान दिला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.