किटक नाशक विभागातील 10 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत किटक नाशक विभागामार्फत शहरात दैनंदिन चॅनेल सफाई, धूर फवारणी, औषध फवारणी तसेच डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिम राबविण्यात येत आहे. किटक नाशक विभागातील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी धूर फवारणीचे काम करीत असल्याच्या तक्रारी बुधवार, दि.19 ऑगस्ट 2026 च्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांकडून प्राप्त झाल्या. या तक्रारींची तसेच सभेतील सदस्यांच्या सूचनांची दखल घेत प्रशासनाने एकाच ठिकाणी दीर्घकाळ धूर फवारणीचे काम करणाऱ्या 10 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

या बदल्यांनुसार धूर फवारणी करणाऱ्या 10 कर्मचाऱ्यांना आता चॅनेल सफाईचे काम देण्यात आले असून, यापूर्वी चॅनेल सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धूर फवारणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात बदल होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, शहरातील डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही अधिक गती मिळणार आहे. तसेच किटकनाशक विभागाकडील आरोग्य निरिक्षक यांच्या उपस्थितीत डिझेलमध्ये औषध मिक्स करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मान्यतेने व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या आदेशानुसार गुरुवारी या बदल्या करण्यात आल्या. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने किटक नाशक विभागाचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच डिझेल व पेट्रोल वापरावरही मर्यादा देण्यात आलेल्या आहेत. आवश्यकतेप्रमाणे तसेच कामाचे मागणी प्रमाणे या कर्मचाऱ्यांना डिझेल व पेट्रोल देण्यात येणार आहे.




