कोकाटेंवरील अटक वॉरंटनंतर मंत्री गायब असणे गंभीर - प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर घणाघात
कोल्हापूर (प्रतिनिधी) - क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होऊनही ते अद्याप समोर न येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. जर मंत्र्यालाच पोलिसांनी पळवून नेले असेल, तर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचे काय? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या न्यायालय आणि कायद्यालाही न जुमानणारी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

क्रीडामंत्री कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवले जात असल्याचा संशय व्यक्त करत, दोन वर्षांची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीचा मतदानाचा अधिकार संपुष्टात येतो, याची आठवण आंबेडकर यांनी करून दिली. त्यामुळे कायदा आणि न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी स्पष्ट अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना आंबेडकर यांनी भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्षांशी युती झाल्याचे सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपविरोधी आघाडी उभारण्यात येणार असून, त्यासाठी स्थानिक नेत्यांना पूर्ण निर्णयाधिकार देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात शिंदे गटाने चार दिवस थांबण्याचे केलेले आवाहन चर्चेसाठी खुले असल्याचेही त्यांनी सूचित केले.
हर्षवर्धन संकपाळ यांच्या भेटीला कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे सांगत ही भेट त्यांच्या मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणासंदर्भातील चर्चेसाठी होती, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेनेने मनसेसोबत युती करून स्वतःची राजकीय पत गमावली असून, त्यामुळे कोकणातील कुणबी समाज, माथाडी कामगार आणि अमराठी वर्ग शिवसेनेपासून दूर गेला, असा दावा त्यांनी केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले की, राजकारणात असताना अनेक गोष्टी माहिती असतात, मात्र ज्या बाबी देशाच्या हिताच्या नसतात त्या सार्वजनिकपणे मांडू नयेत, हे भान राखणे आवश्यक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे भान ठेवणे गरजेचे होते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.




