कोल्हापुरात करोडोंचा रस्ता खड्ड्यात? कळंबा रस्त्यावर डंपर थेट चेंबरमध्ये!
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर महानगरपालिकेच्या करोडो रुपये खर्च करून केलेल्या त्याची पोलखोल पुन्हा एकदा उघड झाली आहे. कळंबा साई मंदिर ते वाशी नाका या रस्त्यावर आज सकाळी एक डंपर रस्त्यावरील चेंबरचे झाकण तुटल्यामुळे थेट चेंबरमध्ये जाऊन अडकला.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अपघात टळला. पण या घटनेमुळे महापालिकेच्या निकृष्ट कामाचा दर्जा आणि निष्काळजीपणा मात्र चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या रस्त्यावर अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाची चेंबरची झाकणे बसवण्यात आली आहेत, तर अनेक ठिकाणी झाकणेच गायब आहेत.
या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. "केएमसी आणि संबंधित ठेकेदार एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का?" असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
करोडो रुपये खर्च करूनही जर रस्त्यांची हीच अवस्था राहणार असेल, तर या 'ड्रीम प्रोजेक्ट'चा फायदा कोणाला? असा सवाल आता उपस्थित होतोय. महापालिका प्रशासन आता तरी या ठेकेदारावर कडक कारवाई करणार की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.




