गणेश नाईकांची भूमिका महायुतीसाठी घातक; शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडण्याचाही प्रयत्न" – शहाजी पाटील
मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांचे नाव एका शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून वगळल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते आक्रमक झाले असून, आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गणेश नाईक हे अल्पसंतुष्ट स्वभावाचे नेते असून त्यांनी पूर्वी महायुती सरकारविरोधातही भूमिका घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला.

शहाजी बापू पाटील म्हणाले की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांमध्ये पालकमंत्र्यांचे नाव समाविष्ट करण्याची परंपरा आहे आणि तिचे पालन सर्वांनी केले पाहिजे. त्यांनी दावा केला की, 1997 मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत असताना गणेश नाईक यांनी शरद पवारांशी संपर्क साधून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता.
नवी मुंबईतील राजकारणावर भाष्य करताना पाटील यांनी, "मी आणि माझी नवी मुंबई" अशी भावना लोकशाहीत योग्य नसल्याचे सांगत गणेश नाईक यांच्या राजकीय प्रभावावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. गुवाहाटीतील बंडानंतरच्या राजकीय घडामोडींमधून ते अद्याप सावरलेले नसल्याचा टोला लगावत त्यांनी भविष्यात अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे वळतील, असा दावा केला.
तसेच, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना, संबंधित नेत्यांचे निर्णय दिल्लीमध्ये घेतले जातात आणि त्याबाबत मुंबईत बसून तर्क लावणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.सोलापूर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बोलताना, महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.




