डी. वाय. पाटलांच्या जाण्याने सर्व समाजाची मोठी हानी ; खासदार शाहू महाराजयांची भावुक प्रतिक्रिया

डी. वाय. पाटलांच्या जाण्याने सर्व समाजाची मोठी हानी ; खासदार शाहू महाराजयांची भावुक प्रतिक्रिया

कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात आणि शैक्षणिक अन् सामाजिक क्षेत्रावर शोकाकुल वातावरण आहे. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना आदरसुमन अर्पण केले.

माध्यमांशी संवाद साधताना खासदार शाहू महाराज म्हणाले, "डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने सर्व समाजाची अत्यंत मोठी हानी झाली आहे. नगरपालिकेत काम करण्यापासून ते आमदार आणि राज्यपाल पदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय होता. जिथे जिथे त्यांनी काम केले, तिथे त्यांनी अत्यंत उत्तम कार्य करून दाखवले."

१५० हून अधिक संस्थांची निर्मिती आणि बहुजनांचा उद्धार

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करताना खासदार शाहू महाराज पुढे म्हणाले, "त्यांनी शिक्षण क्षेत्रात १५० हून अधिक संस्थांची निर्मिती केली. या संस्थांच्या माध्यमातून बहुजन समाजातील अनेक मुले-मुली शिकून बाहेर पडली आणि समाजात आपल्या पायावर उभी राहिली. आज कोल्हापूर, पुणे, मुंबई असो किंवा कुठेही असो; या संस्थांमधून शिकलेली मुले उत्तम काम करत आहेत. शिक्षण देऊन बहुजन समाजाला आधाराची कवाडं खुली करून देणे, हीच त्यांची खरी ओळख होती आणि हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल."

"अनोखे जिव्हाळ्याचे नाते"

आपल्या वैयक्तिक संबंधांबद्दल बोलताना शाहू महाराज म्हणाले, "त्यांच्याशी असणारे नाते अतिशय वेगळे आणि जिव्हाळ्याचे होते. मनात आले की ते थेट भेटायला बोलवायचे, तासन् तास गप्पा व्हायच्या आणि आपुलकीने चौकशी करायचे. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक पातळीवरही मोठे दुःख झाले आहे."