दिशा सालियन प्रकरण: 'मातोश्री'वर ५०० कोटींच्या नोटीसचा हायव्होल्टेज ड्रामा; नितेश राणेंची प्रतिक्रिया

दिशा सालियन प्रकरण: 'मातोश्री'वर ५०० कोटींच्या नोटीसचा हायव्होल्टेज ड्रामा; नितेश राणेंची  प्रतिक्रिया

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार वादळ उठले आहे. शनिवारी (१९ तारीख) दुपारी ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याबाहेर एक मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान हे वकिलांच्या टीमसह आमदार आदित्य ठाकरे यांना तब्बल ५०० कोटी रुपयांची कायदेशीर अब्रुनुकसानीची नोटीस देण्यासाठी थेट 'मातोश्री'वर धडकले.

 सोशल मीडियावरील काही वक्तव्ये आणि पोस्ट्सच्या पार्श्वभूमीवर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हा दावा ठोकला आहे.

'मातोश्री'बाहेर गोंधळ आणि पोलिसांचा बंदोबस्त

सतीश सालियान वकिलांसह पोहोचताच मातोश्रीबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मातोश्रीचे मुख्य गेट बंद करून मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

 

शिवसैनिकांच्या तीव्र विरोधानंतर, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब यांनी पाठवलेले वकील - ॲड. राहुल दिवटे आणि ॲड. अनिल जाधव हे गेटवर आले. त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वतीने ५०० कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस स्वीकारली आणि त्याची पोचपावती सतीश सालियान यांच्या वकिलांकडे सुपूर्द केली.



सतीश सालियान आक्रमक; "मला फक्त देव कंट्रोल करू शकतो!"

मातोश्रीवर जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सतीश सालियान अत्यंत भावूक व आक्रमक भूमिकेत दिसले. ते म्हणाले, "मला कोणीही रोखू शकत नाही किंवा कंट्रोल करू शकत नाही, फक्त देवच मला कंट्रोल करू शकतो. विरोधकांनी वेळ काढूपणा केल्यामुळे या प्रक्रियेला सहा वर्षे गेली, मात्र आता पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यावर मी समाधानी आहे."



भाजप नेते नितेश राणेंची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया

या सर्व धक्कादायक घडामोडींनंतर नेहमी या विषयावर मुखर असणारे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आज सोशल मीडियावर एक अत्यंत संयमी पोस्ट शेअर केली.

"माझ्या सर्व प्रसारमाध्यमांमधील मित्रांनो... दिशा सालियन प्रकरणाबाबत कायद्याला तिची प्रक्रिया पूर्ण करू द्यावी! या विषयावर रोज भाष्य करणे माझ्यासाठी योग्य नाही. धन्यवाद!" नितेश राणे

 सतत आरोप-प्रत्यारोपांनी तापलेल्या या प्रकरणात आता कायदेशीर लढाईला तोंड फुटले असून, आगामी दिवसांत हे प्रकरण काय वळण घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.