तरुणपणी झाडली गोळी, 34 वर्षांनी मिळाली शिक्षा; 85 वर्षीय वृद्धाला जेल

तरुणपणी झाडली गोळी, 34 वर्षांनी मिळाली शिक्षा; 85 वर्षीय वृद्धाला जेल

मुंबई (प्रतिनिधी) : "कायद्याचे हात लांब असतात" याचा प्रत्यय देणारा निर्णय बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील न्यायालयाने दिला आहे. तब्बल ३४ वर्षे जुन्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात न्यायालयाने ८५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  बिहारमधी वैशाली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांच्या न्यायालयाने या जुन्या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयाने १ जून रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर २ जून रोजी आरोपी दीप राय उर्फ जीसा राय याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

बिहारमधील वैशाली जिल्हा न्यायालयाने मंगळवारी २  जून रोजी एका ऐतिहासिक निकालात तब्बल ३४ वर्षे जुन्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात एका ८५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवत तुरुंगात पाठवले. वैशालीचे अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांच्या न्यायालयाने १ जून रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती आणि २ जून रोजी या अत्यंत जुन्या प्रकरणात आपला निकाल सुनावला. न्यायालयाने आरोपी वृद्ध दीप राय याला आर्म्स ॲक्टच्या गंभीर कलमांखाली दोषी ठरवले असून तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

हे प्रकरण १९९२ सालातील आहे. परस्पर वादातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला आणि गोळीबार केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान या नऊ आरोपींपैकी चौघांचा मृत्यू झाला, तर पाच आरोपी अद्याप जिवंत आहेत. त्यामध्ये दीप राय याचाही समावेश आहे.

पोलीस नोंदी आणि न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, १० मे १९९२ रोजी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पीडित व्यक्ती आपल्या पत्नीसोबत घराच्या दारात बसलेली असताना आरोपींनी धारदार शस्त्रांसह त्यांच्यावर हल्ला केला. तसेच दहशत निर्माण करण्याच्या आणि जीव घेण्याच्या उद्देशाने गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्यात दाम्पत्याचा जीव थोडक्यात बचावला होता, मात्र दोघेही गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि १९९३ मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणातील सुनावणी अनेक वर्षे सुरू राहिली. अखेर ३४ वर्षांनंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल देत दीप राय याला दोषी ठरवले. न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या निकालामुळे कितीही वर्षे लोटली तरी गुन्ह्याचा पाठपुरावा थांबत नाही आणि न्याय मिळण्यास विलंब झाला तरी तो नाकारला जात नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.