तुरंबेच्या माजी सरपंच मयुरी भावके यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी) - ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी गावाचे कारभारी म्हणून अहोरात्र झटणाऱ्या सरपंचांचा सन्मान करण्यासाठी दैनिक पुढारीच्या वतीने 'सरपंच सन्मान सोहळा' आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सरपंच मयुरी सागर भावके (तुरंबे ता. राधानगरी) यांचा राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सरपंच सन्मान स्विकारल्यानंतर माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेलशी बोलताना माजी सरपंच मयुरी सागर भावके म्हणाल्या, माझ्या सरंपच पदाच्या कार्यकाळात मी एकूण ९ कोटींची विकासकामे केली. यामध्ये जलजीवन पाणीयोजना, गावातील प्रमुख रस्ते, लाईट (हायमास्ट दिवे), प्राथमिक शाळेतील वर्गखोल्या, आरोग्य केंद्र निवासस्थान, ग्रामपंचायत इमारत नुतनीकरण, सी, सी टी, व्ही कॅमेरे, गहिणीनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, तसेच ज्येष्ठ नागरिक, महिलांना, निराधार मुलामुलींसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. विकासकामे करत असताना ग्रामपंचायतीच्या आजी माजी सदस्यांचे आणि गावातील सर्व तरूण मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या सन्मानसोहळ्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सरपंच मयुरी भावके यांचा सन्मान झाल्यानंतर पंचक्रोशीतून शुभेच्छांच्या माध्यमातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.




