मटका किंग ’चा ट्रेलर पाहिलात? अमिरी, जुगार आणि मटक्याचा काळा धंदा

मटका किंग ’चा ट्रेलर पाहिलात? अमिरी, जुगार आणि मटक्याचा काळा धंदा

मुंबई (प्रतिनिधी) : सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या दर्जेदार प्रोजेक्ट्समधून मातीतल्या वास्तववादी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे दिग्दर्शक-निर्माते नागराज पोपटराव मंजुळे आता ओटीटीवर नव्या अवतारात झळकणार आहेत. मटका किंग या वेबसिरीजच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा एका जबरदस्त कथानक घेऊन समोर आले आहेत. या वेब सिरीजची सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे. ओटीटीवर येणारी 'मटका किंग' ही वेब सिरीज केवळ एक गुन्हेगारी कथा म्हणून पाहणं मोठी चूक ठरेल. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ही नवी निर्मिती एका अशा जगात घेऊन जाते, जिथे ‘मटका’ हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.

‘मटका किंग’ची कथा एका अशा काळात घडते, जेव्हा मटका हा केवळ खेळ नव्हता, तर अनेकांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. या जगात पैसा जितक्या वेगाने येतो, तितक्याच वेगाने माणसाला गिळतोही. मालिका या जगाच्या ग्लॅमरला फक्त पृष्ठभागावर ठेवत नाही, तर त्यामागचं काळं वास्तव उघड करत जाते. एक अशी दुनिया, जी कधीकाळी जगली गेली होती, आणि एक असा व्यक्तिरेखा, जी निरीक्षण आणि अनुभवातून घडवली गेली,हे दोन्ही प्राइम व्हिडिओच्या “मटका किंग” मध्ये एकत्र येतात. 

विजय वर्मासोबत काम करण्याबद्दल आणि बृज भाटी घडवण्याबद्दल, नागराज म्हणतात, “विजय एक उत्कृष्ट अभिनेता आहे, आणि त्याच्यातली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तो आपल्या व्यक्तिरेखेवर खूप खोलवर विचार करतो. प्रत्येक सीनमध्ये त्याचा पात्र असं का वागतोय, हे समजून घेण्यासाठी तो सतत प्रश्न विचारतो. आम्ही अनेकदा शूटिंगपूर्वी बसून सीनवर चर्चा करत असू. मी नेहमी थोडी मोकळीक ठेवतो, जेणेकरून शेवटच्या क्षणी बदल करता येतील, आणि विजयचे प्रश्न आम्हाला आमच्या मर्यादेपलीकडे घेऊन गेले. त्यामुळे प्रत्येक सीन अधिक चांगला बनला, कारण मटका किंग हा बारकाव्यांचा खेळ आहे. त्याने खूप संयमाने काम केले आणि या भूमिकेत आपलं पूर्ण मन ओतलं. आता जेव्हा तुम्ही हे पाहाल, तेव्हा तो खरोखर या मालिकेत हिरोसारखा दिसतो.”