दारू, सिगारेट आणि प्रायव्हसीबाबत दिव्या अग्रवालचा मोठा खुलासा
मुंबई (प्रतिनिधी) : बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडतं? स्पर्धकांना दारू दिली जाते का? घरात कॅमेऱ्यांपासून लपून काही घडतं का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात कायम असतात. आता बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वाची विजेती दिव्या अगरवाल हिने या सर्व चर्चांवर स्पष्ट भाष्य केलं आहे.एका पॉडकास्टमध्ये बोलताना दिव्याने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिच्या मते, घरात टोमॅटो केचअप, कॉफी यांसारख्या साध्या गोष्टीही सहज उपलब्ध नसतात. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींचं महत्त्व स्पर्धकांना अधिक जाणवतं. खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर निर्मात्यांचे कडक नियम असतात, असंही तिने सांगितलं.

सिगारेटबाबत मात्र परिस्थिती वेगळी असल्याचं दिव्याने नमूद केलं. तिच्या म्हणण्यानुसार, सिगारेटला लक्झरी आयटम मानलं जात नाही आणि ती स्पर्धकांना उपलब्ध करून दिली जाते. दररोज सकाळी स्पर्धकांना त्यांच्या पसंतीच्या ब्रँडबद्दल विचारलं जातं.बिग बॉसच्या घरात दारू दिली जाते का, या चर्चेलाही दिव्याने पूर्णविराम दिला. “घरात कोणत्याही स्पर्धकाला दारू दिली जात नाही. याबाबत पसरलेल्या अनेक अफवा निराधार आहेत,” असं तिने स्पष्ट सांगितलं.
प्रायव्हसीच्या मुद्द्यावर बोलताना दिव्याने सांगितलं की, प्रेक्षकांना स्क्रीनवर जे दिसतं त्यापेक्षा घरात अनेक गोष्टी घडत असतात. मात्र त्याचा अर्थ अफवा पसरवल्या जातात तसा नसतो.शो संपल्यानंतर चाहत्यांकडून तिला अनेक गंमतीशीर प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी एक प्रश्न होता, “स्पर्धकांच्या ग्रुमिंगसाठी बाहेरून लोक येतात का?” यावर दिव्याने स्पष्ट केलं की, घरात अशा प्रकारची कोणतीही बाह्य मदत दिली जात नाही. स्पर्धकांना स्वतःचं ग्रुमिंग स्वतःलाच करावं लागतं.दिव्याच्या या खुलाशांमुळे बिग बॉसच्या घराबद्दलच्या अनेक अफवा आणि गैरसमजांवर पडदा पडला आहे.




