शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईची ‘बगला माता’ रूपात पूजा
कोल्हापूर (प्रतिनिधी) - शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ‘श्री बगला माता’ या स्वरूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. अमृत समुद्रामधील रत्नजडित वेदिका असलेल्या मणिमंडपात सिंहासनावर विराजमान असलेल्या या देवीचे रूप पिवळ्या रंगाचे असून, तिने पिवळे वस्त्र आणि अलंकार धारण केले आहेत. एक हातात गदा आणि दुसऱ्या हातात शत्रूची जीभ पकडलेले हे रूप अत्यंत तेजस्वी व प्रभावशाली मानले जाते.

बगला देवी बडवामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी आणि ज्वालामुखी या नावांनीही प्रसिद्ध आहे. तिची उपासना द्विभुज किंवा चतुर्भुज स्वरूपात केली जाते. असं म्हणतात की, बगला देवीची पूजा केल्याने शत्रूंच्या वाईट कृती, अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळ यांसारख्या आपत्ती टळतात. तसेच वशीकरण, रोगशांती आणि चमत्कारिक सिद्धी प्राप्त होतात, अशी भाविकांची धारणा आहे.




