झेडपी शाळांचा कायापालट होणार; गुणवत्तावाढीसह पायाभूत सुविधांवर भर : सभापती शितल यादव

झेडपी शाळांचा कायापालट होणार; गुणवत्तावाढीसह पायाभूत सुविधांवर भर : सभापती शितल यादव

कोल्हापूर/प्रतिनिधी : "शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याने मिळवलेले यश हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. मात्र, केवळ याच यशावर समाधान मानता प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि कोल्हापूर जिल्ह्याला शिक्षण क्षेत्रात राज्यात पहिल्या क्रमांकावर नेणे हेच आता आपले नवे ध्येय आहे," असा विश्वास कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण अर्थ समितीच्या सभापती शितल यादव यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्या बोलत होत्या.

या बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, शाळांच्या पायाभूत सुविधा आणि सद्यस्थितीतील पावसाळी परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; 'त्या' शाळांवर लक्ष ठेवा

सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना कोणतीही अडचण किंवा धोका निर्माण होऊ नये, यासाठी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (BEO) योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा कडक सूचना सभापती शितल यादव यांनी दिल्या.

पायाभूत सुविधा आणि सेमी-इंग्रजी वर्गांवर भर

बैठकीत जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजीचे वर्ग सुरू करणे, वर्गवाढ मंजुरी, जुन्या शाळांचे निर्लेखन (Scrapping) आणि शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शाळांमध्ये सेमी-इंग्रजी वर्ग सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आदेश यावेळी देण्यात आले.

सदस्यांनी मांडले महत्त्वाचे प्रश्न:

  • अमरसिंह चव्हाण (सदस्य): जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
  • एकनाथ पाटील (सदस्य): शिक्षकांच्या पदोन्नती, निवडश्रेणी आणि शिक्षण विभागाकडे प्रलंबित असलेल्या इतर महत्त्वाच्या विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
  • रेखाताई मुगडे (सदस्या): करवीर तालुक्यातील शाळांच्या निर्लेखनाचा प्रश्न आणि शाळांमधील शौचालये पाण्याच्या टाक्या बदलण्याची अत्यंत निकडीची गरज मांडली.

गुणवंतांचे कौतुक...
 शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सभापतींनी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सभेच्या सुरुवातीला शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी सर्वांचे स्वागत करून शासन निर्णय परिपत्रकांचे वाचन केले. या बैठकीला शिक्षण समिती सदस्य एकनाथ पाटील, स्नेहल वेल्हाळ, सानिकाआवाडे, अमरसिंह चव्हाण, भगवान पाटील, रेखाताई  मुगडे, उत्तरा शिंदे, शुभागी कुंभार, उपशिक्षणाधिकारी, सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारीआणि विस्तार अधिकारी उपस्थित होते. शेवटी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतयांनी उपस्थितांचे आभार मानले.