“द ग्रेट इंडियन कपिल शो” अडकला वादाच्या भोवऱ्यात
मुंबई - टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवर प्रसारित होणारा शो “द ग्रेट इंडियन कपिल शो” प्रेक्षकांचा आवडता आहे. नुकताच या शोच्या नव्या सीझनचा पहिला भाग प्रदर्शित झाला असून त्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. मात्र, या लोकप्रियतेदरम्यानच शो एका कायदेशीर वादात अडकला आहे. शोच्या काही एपिसोडमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध गाणी परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (PPL) इंडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शोमध्ये तीन गाणी परवाना न घेता वापरण्यात आली आहेत.

या गाण्यांमध्ये “मुन्ना भाई एमबीबीएस” (2003) मधील “एम बोले तो”, “कांटे” (2002) मधील “रामा रे” आणि “देसी बॉईज” (2011) मधील “सुबा होने ना दे” यांचा समावेश आहे. ही गाणी नेटफ्लिक्सवरील तिसऱ्या सीझनच्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये ऐकायला मिळाली होती.
PPL इंडियाच्या मते, या गाण्यांचा वापर कॉपीराइट कायदा 1957 अंतर्गत “सार्वजनिक कामगिरी किंवा लोकांशी संवाद” या श्रेणीत येतो, ज्यासाठी अधिकृत परवाना आवश्यक असतो. मात्र, संबंधित हक्कधारकांकडून कोणताही परवाना घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे K9 फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बीइंगयू स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थांवर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे.
२१ जून ते २० सप्टेंबर दरम्यान प्रसारित झालेल्या तीन एपिसोडमध्ये ही गाणी वापरण्यात आली होती. पहिल्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असताना “एम बोले तो” हे गाणे वाजवण्यात आले. दुसऱ्या भागात “रामा रे” ट्रॅक, तर तिसऱ्या एपिसोडमध्ये अक्षय कुमारच्या “देसी बॉईज” चित्रपटातील “सुबा होने ना दे” हे गाणे वापरण्यात आले.
दरम्यान, चौथ्या सीझनच्या पहिल्या भागात प्रियांका चोप्रा झळकली असून ती लवकरच दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आगामी ‘वाराणसी’ चित्रपटात दिसणार आहे. या बिग बजेट चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत असून सुमारे १३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार केला जात आहे.




