निवडणुकीपूर्वी 24, आता 12 रुपये; कांदा दरघटीवर रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, आखाती देशातील युद्ध, निसर्गाचा प्रकोप आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुरता अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज लासलगाव बाजार समितीत 'शेतकरी एल्गार' आंदोलन पुकारले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला.

आमदार रोहित पवार यांनी स्वतः कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चालवत बाजार समितीच्या आवारात प्रवेश केला, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात पालघरचे माजी आमदार सुनील भुसारा, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्यासह हजारो कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, "निवडणुकीच्या आधी सरकार कांद्याला 24 रुपये भाव जाहीर करते आणि निवडणूक संपताच 12 जाहीर करते. फडणवीस साहेब काल म्हणाले की, आम्ही साडेबारा रुपये देऊ, तुम्ही काय उपकार करत आहात का? अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाल्यामुळे जिथे 5 ट्रेलर उत्पादन निघायचे तिथे आज 3 ट्रेलर निघत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रति किलो 18 रुपये होत असताना माल 2 ते 3 रुपयांनी विकला जात आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कांद्याला 22 ते 24 रुपये प्रति किलो दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि 'नाफेड'च्या कारभारावर गंभीर आरोप केले. "मागील वेळी सरकारने 200 रुपये कांदा अनुदान जाहीर केले, मात्र प्रत्यक्षात अवघे 50 रुपये दिले. उर्वरित 150 रुपयांचे काय झाले? नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून खरात या फेमस भोंदू बाबाने देखील नाफेड मार्फत पैसा खाल्ला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. पाशा पटेल यांच्या समितीवर टीका करताना, "समिती स्थापन केली, त्यांनी मग काय भजे तळले का? दोन महिन्यात अहवाल देणार होते, त्याचे काय झाले?" असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, या एल्गार आंदोलनात शेतकऱ्यांनी कमरेला केळीचे पाने गुंडाळले व गळ्यात कांद्याच्या माळा घातलेल्या दिसून आल्या. शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला नाही तर लवकरच शेतकऱ्यांचे कपडे उतरावे लागतील. त्यामुळे भविष्यात कमरेला केळीचे पाने गुंडाळावे लागतील, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.




