न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 'अँटी रॅगिंग मार्गदर्शन' कार्यक्रम संपन्न

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 'अँटी रॅगिंग मार्गदर्शन' कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'अँटी रॅगिंग मार्गदर्शन' कार्यक्रम उत्साहात पार पडला. रॅगिंगसारख्या गैरप्रकारांना आळा घालणे आणि विद्यार्थ्यांना कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध विधीतज्ज्ञ ऍडव्होकेट पूजा देशमुख उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रॅगिंग विरोधी कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. 

मार्गदर्शन करताना ऍडव्होकेट पूजा देशमुख म्हणाल्या, "रॅगिंग हा केवळ एक चेष्टा-मस्करीचा भाग नसून, तो एक गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने रॅगिंगचा मानसिक किंवा शारीरिक त्रास सहन करू नये. अशा प्रकारांना वेळीच पायबंद घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक राहून कायदेशीर मार्गांचा अवलंब केला पाहिजे." कॉलेज कॅम्पसमध्ये सुरक्षित आणि निकोप वातावरण राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र कुंभार होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कुंभार म्हणाले, "महाविद्यालयात रॅगिंग विरोधी समिती (Anti-Ragging Committee) अत्यंत तत्परतेने काम करत असून संपूर्ण परिसर रॅगिंगमुक्त ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन विद्यार्थ्यांनी कोणत्याही भीतीशिवाय आपले शिक्षण पूर्ण करावे." या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.