पाणीपट्टी दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही; घटकांनुसार वर्गीकरण करून दर निश्चित करा : सभापती संगीता सावंत

पाणीपट्टी दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही; घटकांनुसार वर्गीकरण करून दर निश्चित करा : सभापती संगीता सावंत

महासभेत पाणीपट्टी प्रस्तावावर चर्चा; नागरिकांचा विचार करूनच निर्णय घेण्याची सभापतींची सूचना

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावावर बोलताना पाणी पुरवठा समितीच्या सभापती संगीता सावंत यांनी प्रशासनाच्या प्रस्तावावर तीव्र आक्षेप नोंदवला. प्रशासनाने तयार केलेला पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव सर्वसामान्य जनतेला परवडणारा नाही. त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक स्थितीनुसार वर्गीकरण करूनच सुधारित दर निश्चित केले जावेत, अशी ठाम भूमिका सभापती संगीता सावंत सभागृहात मांडली.

महासभेत बोलताना नगरसेविका संगीता सावंत म्हणाल्या, "प्रशासनाने पाणीपट्टी वाढीचा जो प्रस्ताव तयार केला आहे, तो अतिशय मोठा असून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारा नाही. कोल्हापूरच्या जनतेने नेहमीच महापालिकेला सहकार्य केले आहे. अगदी एक दिवसाआड पाणी येत असतानाही नागरिकांनी कधीही सहकार्याची भूमिका सोडलेली नाही. आजही पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेला उत्पन्नाची गरज आहे, हे मान्य असले तरी थेट दरवाढ लादणे योग्य नाही."

६ महिन्यांच्या रुटीनसाठी दरवाढ, पण जनतेचा विचार हवा

पाणीपुरवठा यंत्रणेचे पुढील ६ महिन्यांचे रुटीन आणि आर्थिक व्यवस्थापन सुरळीत चालण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ही दरवाढ करताना आपल्याला थेट जनतेसमोर जाऊन सामोरे जावे लागणार आहे. आगामी काळात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावा लागेल, असे संगीता सावंत यांनी स्पष्ट केले.

आर्थिक घटकांनुसार वर्गीकरण करण्याची सूचना

दरवाढ करताना सर्व घटकांना एकाच तराजूत न तोलता त्यांचे योग्य वर्गीकरण करण्याची सूचना सावंत यांनी दिली. त्या म्हणाल्या, "प्रशासनाने अतिसामान्य, सामान्य आणि सधन अशा घटकांमध्ये वर्गवारी (Category) करावी. अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही अशाच पद्धतीने दरांची रचना निश्चित केली पाहिजे."

पाणीपट्टी दरवाढ करायची का आणि ती किती प्रमाणात असावी, याचा अंतिम निर्णय सभागृहाने सर्वसामान्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच घ्यावा, असे आवाहनही संगीता सावंत यांनी शेवटी केले.