'पीटीएम'चा रंकाळ्यावर 6-0 विजय; ऋषिकेश मेथे-पाटीलची हॅट्ट्रिक

'पीटीएम'चा रंकाळ्यावर 6-0 विजय; ऋषिकेश मेथे-पाटीलची हॅट्ट्रिक

 कोल्हापूर  (प्रतिनिधी): छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळाने (पीटीएम) रंकाळा तालीम मंडळावर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला. पीटीएमच्या ऋषिकेश मेथे-पाटीलने सलग तीन गोल नोंदवत स्पर्धेतील आपली पहिली हॅट्ट्रिक साजरी केली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच पीटीएमने आक्रमक पवित्रा घेतला. १६ व्या मिनिटाला नबी खानच्या पासवर प्रथमेश हेरेकरने पहिला गोल केला. पाठोपाठ ३३ व्या मिनिटाला हेरेकरच्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने गोल करत मध्यंतरापर्यंत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पीटीएमने खेळाचा वेग वाढवला. ५७ व्या मिनिटाला ऋषिकेशने दुसरा गोल केला, तर ६५ व्या मिनिटाला ओमकार मोरेने मैदानी गोलची नोंद केली. ७८ व्या मिनिटाला रोहित पवारच्या पासवर हेरेकरने पुन्हा एकदा जाळी भेदली. ७९ व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटीलने आपला वैयक्तिक तिसरा गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि ६-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.

​       रंकाळ्याचा गोलकीपर शरद मेढे याने रोहित मंडलिकचा फ्री-किकवरील गोल निश्चित मानला जाणारा फटका उत्कृष्टपणे अडवून लक्ष वेधून घेतले. पीटीएमकडून अमीन कझीर, अक्षय पायमल तर रंकाळ्याकडून सोहम निकम, अमित जाधव यांनी लढा दिला. ऋषिकेश मेथे-पाटील 'सामनावीर' ठरला.