पूरग्रस्तांसाठी महापालिकेची आरोग्य सेवा सज्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीपर्यंत पोहोचली असल्यामुळे संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. शहरातील पुरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी एकूण 30 निवारा केंद्रे उभारण्यात आले असून या ठिकाणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेवेची सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या छावण्यांमध्ये आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी महापालिकेने 2 सहाय्यक नियंत्रण अधिकारी आणि 37 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या आरोग्य पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा तर नोडल ऑफिसर म्हणून डॉ. अमोलकुमार माने काम पाहणार आहेत. आवश्यकतेनुसार सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडून इंटर्न डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार आहे.
विशेषतः गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना योग्य औषधोपचार देण्याची तर गंभीर स्थितीतील रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे व वॉर्ड दवाखान्यांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहका-र्याने निवारा छावण्यांमध्ये दैनंदिन आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे.
यासाठी महापालिकेच्या भांडार विभागाकडून पर्याप्त औषधसाठा करून ठेवण्यात आला आहे. तसेच नागरिकांना दिलेल्या आरोग्य सेवेचा एकत्रित दैनंदिन अहवाल तयार करण्याची जबाबदारी सांख्यिकी अधिकारी संजय कुंभार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या या सज्जतेमुळे पुरग्रस्त नागरिकांना योग्य आरोग्य सेवा वेळेत मिळून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.