प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा! धरणातून पूर्वसूचनेशिवाय सोडलं पाणी; वैनगंगा नदीत ट्रॅक्टरसह ३ कामगार वाहून गेले, पण...
भंडारा: गोंदिया आणि भंडारा जिल्हा प्रशासनाचा एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणा हलगर्जीपणा समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून स्थानिक प्रशासन किंवा नदीकाठच्या नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वैनगंगा नदीत लाखो क्युसेक पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा प्रचंड मोठा लोंढा अचानक आल्यामुळे, भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी नदीपात्रात रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम करणारे ३ कामगार ट्रॅक्टरसह नदीच्या पुरात अडकले आणि बघता बघता वाहून गेले. मात्र, तिघांनीही पोहता येत असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

नियमांना फासला हरताळ :
नियमानुसार, कोणत्याही धरण किंवा बॅरेजमधून नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि नदीकाठच्या गावांना 'अलर्ट' जारी करणे बंधनकारक असते. मात्र, धापेवाडा बॅरेज प्रशासनाने या नियमांना पूर्णपणे हरताळ फासला. या प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे तीन निष्पाप कामगारांचा जीव धोक्यात आला होता. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ट्रॅक्टर चालकासह दोन कामगार ट्रॅक्टरसह नदीपात्रात अडकले. पाण्याचा वेग जास्त असल्याने ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला. यावेळी तिघांनीही जीवाची बाजी लावत स्वतःची कशीबशी सुटका केली आणि पोहत नदीचा काठ गाठला.
शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान आणि प्रशासनाची नोटीस:
गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बॅरेजमधून पाणी सोडण्यात आले, परंतु योग्य नियोजनाअभावी हा थरार घडला. या घटनेत ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, धापेवाडा बॅरेजच्या अभियंत्यांना तातडीने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. आता या नोटिसीला अभियंता काय उत्तर देतात आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर काय कडक कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




