मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही?" मराठा तरुणाचा खासदार ओमराजे निंबाळकरांना सवाल; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही?" मराठा तरुणाचा खासदार ओमराजे निंबाळकरांना सवाल; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

 मुंबई/धाराशिव: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी १९ सप्टेंबरला मुंबईत दाखल होण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच एका मराठा तरुणाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन करून "तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही?" असा जाब विचारल्याचा प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

खासदार ओमराजेंनी दिलं स्पष्टीकरण 

व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये तरुणाने विचारले की, "मनोजदादांचे उपोषण सुरू असताना तुम्ही त्यांना भेटायला का गेला नाही?" यावर उत्तर देताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, "मी अकरा वेळा मनोज जरांगेंची भेट घेऊन आलो आहे, ते तुम्हाला दिसले नाही का?" त्यावर तरुणाने सध्याच्या टप्प्यात न गेल्याबद्दल विचारणा केली असता, "आमदार कैलास पाटील भेटून आले आहेत आणि आम्हीदेखील लवकरच भेटायला जाणार आहोत," असे स्पष्टीकरण ओमराजेंनी दिले.

 

"आम्ही समाज म्हणून मतदान करतो" 

संवादादरम्यान तरुणाने, "कैलास पाटील उद्धव ठाकरे गटाचे आहेत आणि तुम्ही शिंदे गटाचे; मग काय संबंध? आम्ही मराठा समाज म्हणून तुम्हाला मतदान करतो, त्यामुळे दादा हे चुकीचे आहे," असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. या कॉल रेकॉर्डिंगची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

 

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला खासदार शाहू महाराजांचा पाठिंबा

दुसरीकडे, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. "मनोज जरांगे यांना वेळोवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या याच भूमिकेमुळे जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे," असा आरोप त्यांनी केला. तसेच, संपूर्ण कोल्हापूरचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही शाहू छत्रपती यांनी नमूद केले.