महिला नेतृत्वाला चालना; शिवसेनेचा ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा १५ जूनपासून

महिला नेतृत्वाला चालना; शिवसेनेचा ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा १५ जूनपासून

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आणि मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज्यव्यापी ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौऱ्याचे आयोजन केले आहे. १५ ते १६ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या या दौऱ्याची माहिती दौऱ्याच्या समन्वयक तथा शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाळासाहेब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना सचिव तथा आमदार डॉ. मनिषा कायंदे, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, राष्ट्रीय सचिव शायना एन.सी. आणि उपनेत्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.मीनाताई कांबळी यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत महिलांनी शिवसेना आणि महायुतीला मोठा पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता महिला सेनेच्या नेत्या राज्यभर विधानसभानिहाय दौरे करून संघटनात्मक आढावा घेणार आहेत. गेल्या चार वर्षांत विविध पक्षांतील अनेक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख पदांच्या नियुक्त्यांबाबत या दौऱ्यात चर्चा व निर्णय घेतले जाणार आहेत.

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सांगितले की, महिला नेतृत्वाला संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दौऱ्याचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजना, ‘लाडकी लेक’ योजना, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश आणि एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. महिलांच्या प्रगतीला प्राधान्य देत अनेक निर्णय राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.