“मी मंत्र्याचा ओएसडी” म्हणत स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण, धमकी – पीडितेची आपबीती

“मी मंत्र्याचा ओएसडी” म्हणत स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण, धमकी – पीडितेची आपबीती

पुणे (प्रतिनिधी) :  भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विजय धुलचंद कारंडे असं सावेंच्या ओसडींचं नाव आहे, त्यांच्यावर पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कारंडे यांनी आपल्या लहान मुलालाही बॅटने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी नवीन गार्डन या त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. तर अतुल सावे यांच्या ओएसडीच्या पीडित पत्नी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली.

मंत्री अतुल सावे यांच्या ओएसडीच्या घरीच कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं समोर आलं आहे. मी मंत्र्याचा ओएसडी माझा कोणी काहीही बिघडवू शकत नाही म्हणत पत्नीला धमकी दिली. त्याचबरोबर पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नीच्या हातापायावर काळे निळे डाग पडले होते. मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांनी स्वतःच्याच पत्नीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर मुलाला देखील मारहाण केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या पत्नीने मोबाईलचा पासवर्ड मागितला याचा त्यांना राग आला आणि त्यानंतर त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. तीन वर्षांपासून अतुल सावे यांच्याकडे ते ओएसडी म्हणून काम करतात अशी माहिती समोर आली आहे. 

पत्नीला सोबत मुंबईत घेऊन गेले नाही. मुलांनाही पुण्यातच ठेवलेलं. त्यामुळे पत्नीला संशयाला आणि त्यांनी मोबाईलच्या पासवर्ड बाबत विचारणा केली होती. याचाच राग मनात धरून मारहाण केली आहे. सोबतच मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही असं म्हणत पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देखील दिली. हा सगळा त्रास झाल्यानंतर पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि विजय कारंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी विजय कारंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या विजय कारंडे यांचा पोलीस शोध घेत आहे. पत्नीच्या वडिलांना देखील धमक्या देऊन त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची मागणी केल्याचे देखील पत्नीच्या वडिलांनी सांगितलं आहे.