चंद्रपूर काँग्रेसमध्ये गटनेतेपदाचा वाद तीव्र; 16 नगरसेवकांच्या अपात्रतेची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजेश अडुर यांनी प्रतिभा धानोरकर गटातील 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली निर्णय घेऊ नये, अन्यथा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

राजेश अडुर यांनी सांगितले की, चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे 27 नगरसेवक आहेत आणि ते सध्या गटनेते आहेत. त्यांनी 13 तारखेला बैठक बोलावली होती, जी 14 तारखेला पार पडली. या बैठकीस 16 नगरसेवक गैरहजर राहिल्याने त्यांनी पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अडुर यांनी आरोप केला की, काही प्रभावशाली नेत्यांच्या दबावाखाली एका दलित नगरसेवकाला गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच पैशाच्या जोरावर नगरसेवकांना एकत्र आणले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपविरोधात संघर्ष करण्याऐवजी पक्षातील काही नेते अंतर्गत संघर्ष वाढवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रतिभा धानोरकर गटातील 16 नगरसेवकांनी राजेश अडुर यांना गटनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसतानाच दोन्ही गट विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.




