मुंबई इंडियन्सचं IPL 2026 मधून पॅकअप?, चाहते लागले रडू
मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची (MI) गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी तब्बल 6 सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याने मुंबईचे चाहते भावूक झाले. सोशल मीडियावर सध्या मुंबईच्या चाहत्यांच्या भावूक पोस्ट आणि मीम्सचा महापूर आला असून, "असं करू नको देवा, चार लोकात उठायचं-बसायचं अवघड झालंय," अशी आर्त साद चाहते आपल्या लाडक्या संघाला घालत आहेत.

मुंबई इंडियन्सचा चाहता वर्ग हा जगातील सर्वात मोठ्या फॅनबेसपैकी एक मानला जातो. मात्र, यंदाच्या हंगामातील खराब कामगिरी आणि संघ व्यवस्थापनातील बदलांमुळे चाहते आधीच नाराज होते. त्यातच सलग पराभवामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला संताप आणि दुःख व्यक्त करायला सुरुवात केली आहे. "आम्हाला ऑफिसमध्ये आणि मित्रांमध्ये आता ट्रोल केलं जातंय," अशी भावना अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. काही मिम्समध्ये चाहत्यांनी देवाला साकडं घातलंय की, "कमीतकमी सन्मानजनक कामगिरी तरी करा, जेणेकरून आम्हाला चार चौघात ताठ मानेने चालता येईल."
मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर सलग चार सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईने 243 धावा केल्या. रायन रिकल्टनने 123 धावांची ऐतिहासिक खेळी केली, जी आयपीएलच्या इतिहासात मुंबईच्या फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज गोलंदाज संघात असूनही, मुंबईला ही मोठी धावसंख्या वाचवता आली नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पॉवरप्लेमध्ये 93 धावा केल्या. त्यांनी 8.4 षटकांत पहिल्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. पण, वेळोवेळी विकेट पडत असल्याने मुंबई पुनरागमन करेल असे वाटत होते, पण हेनरिक क्लासेन आणि सलील अरोरा यांच्या स्फोटक खेळीमुळे संघाने आठ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.




