मोठी राजकीय घडामोड! सचिन अहिर शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या रिंगणात
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सचिन अहिर यांनी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यामुळे या घडामोडीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अलीकडेच काही खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांच्या या निर्णयाने त्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन अहिर यांच्याशी काही दिवसांपासून शिंदे गटाकडून संपर्क सुरू होता. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांचा प्रभावी जनसंपर्क आणि कामगार संघटनांमधील मजबूत पकड मानली जाते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा स्थानिक तसेच राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या घडामोडीनंतर ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असेल आणि विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत पुढे कोणते राजकीय समीकरण पाहायला मिळेल, याची उत्सुकता वाढली आहे.




