मोदींच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद; 15 दिवसांत सोन्याची आयात 70% घटली, सराफ बाजारावर परिणाम; आजचे सोन्या-चांदीचे दर

मोदींच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद; 15 दिवसांत सोन्याची आयात 70% घटली, सराफ बाजारावर परिणाम; आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य आशियातील तणावामुळे देशात महागाई सातत्याने वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीपासून ते दूध-साखरेपर्यंतचे दर वाढले असतानाच, आता सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अशातच पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशवासीयांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे बघायला मिळत आहे. देशभर सोन्याची आयात आणि विक्रीत घट झाल्याचे चित्र आहे. २७ मे पर्यंतच्या 15 दिवसांत सोन्याची आयात तब्बल 70% ने घटली आहे. तर सोन्याची आयात 22 टनांवरुन 7.5 टनांपर्यंत घटली आहे. आयातशुल्क आणि मोदींच्या आवाहनामुळं सोने आयात, विक्रीत घट झाली असून वर्षभर सोनं खरेदी करु नका असं पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर हे चित्र बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दारातही याचा परिणाम बघायला मिळत आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतात सोन्याची आयात महागली आहे, ज्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. आज, शनिवार, ३० मे रोजी, भारतात सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, सुरुवातीच्या व्यवहारात 24-कॅरेट सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ होऊन तो 1,57,650 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही 100 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर, एक किलो चांदीचा भाव आता 2,80,100 रुपये झाला आहे. तर सुवर्णनागरी जळगावमध्ये सोने चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. काल (29 मे) असलेले सोने दर 155000 तर चांदी 264000 आजही कायम आहेत. यावरून असे दिसून येते की, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा जोरदार सुधारणा होत आहे. अमेरिका-इराण युद्धाच्या अनिश्चिततेच्या आणि जागतिक महागाईच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची मागणी पुन्हा वाढली आहे.

भारतात चांदीच्या दरातही आज प्रति किलो 5,000 रुपयांपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे, त्याची किंमत आता ₹2,80,000 ते ₹2,85, 000 च्या दरम्यान आहे. किंबहुना, चेन्नईसारख्या दक्षिण भारतातील काही इतर राज्यांमध्ये चांदीची किंमत ₹2,90,000 प्रति किलोग्रामवर पोहोचली आहे.सराफा बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जागतिक बाजारातील वातावरण निरुत्साही झाले आहे. शेअर बाजारातही सतत चढ-उतार होत आहेत. परिणामी, गुंतवणूकदार आपले भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी इक्विटीमधून पैसे काढून घेत आहेत आणि ते पुन्हा सोने-चांदीमध्ये गुंतवत आहेत, ज्यामुळे किमतींना मोठा आधार मिळाला आहे.